Search This Blog

Saturday 26 February 2011

विषनिवृत्तीनंतर महाशिवरात्री


जीवनाचा संघर्ष हे एक समुद्रमंथन होय. सूर्यनाडी, चंद्रनाडी किंवा इडा-पिंगला यांच्यातून होणाऱ्या संदेशाचे व चेतनेचे चलनवलन झाल्यामुळे मेरुदंडरूपी मेरुपर्वत घुसळला जाऊन शरीरातील संपूर्ण रससागर ढवळला जातो. त्यातून जशा सिद्धी प्राप्त होतात, तसे काही अंशी धोकेही निर्माण होतात. विषाच्या व्यवस्थापन प्रक्रियेत आयुर्वेदाचा हातखंडा तर आहेच, पण या विषयाचा विचार करणारे आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे असे दिसून येते. शरीरात जमलेले विष पंचकर्माद्वारे काढून टाकणे याला आयुर्वेदिक उपचारामध्ये मोठे महत्त्व दिसते.
शिवरात्र जवळ आली की आठवण होते थंडाई, भांग यांची. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास बाग, शेती वगैरे ठिकाणी सर्पदर्शन होते. महाशिवरात्रीच्या आसपास सर्पांची रतिक्रीडाही पाहायला मिळते. भगवान श्री शंकरांची समाधी व भांगेसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे येणाऱ्या तंद्रा या दोन गोष्टी अगदीच वेगळ्या असतात
जसे श्री शंकरांनी समुद्रमंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी मानवकल्याणाची रत्ने इतरांना वाटून विष मात्र स्वतः स्वीकार करून पचवले व निरुपयोगी केले, तसे आयुर्वेद शास्त्राने प्रत्येक वस्तूतील विषाची शुद्धी करण्याची प्रक्रिया दाखवून औषधे तयार केली. ज्या विषामुळे सर्व सृष्टीचा नाश होऊ शकला असता असे समुद्रमंथनातून निघालेले हलाहल भगवान श्री शंकरांनी प्राशन केले व ते आपल्या कंठात साठविले अशी कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे.
जीवनाचा संघर्ष हे एक समुद्रमंथन होय. सूर्यनाडी, चंद्रनाडी किंवा इडा-पिंगला यांच्यातून होणाऱ्या संदेशाचे व चेतनेचे चलनवलन झाल्यामुळे मेरुदंडरूपी मेरुपर्वत घुसळला जाऊन शरीरातील संपूर्ण रससागर ढवळला जातो. त्यातून जशा सिद्धी प्राप्त होतात तसे काही अंशी धोकेही निर्माण होतात. रात्रीच्या अंधारात प्रकाशासाठी वापरलेली विजेरी जरी उपयोगी वाटली व सुखकारक असली तरी त्यात वापरलेले सेल्स निकामी झाल्यानंतर वाटेल तसे फेकून दिले, तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटात मिसळले गेलेले विष संपूर्ण मानवजातीला बाधक ठरते. म्हणून या निकामी सेल्सची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्‍न असतो. हाच प्रश्‍न संगणक व आधुनिक जीवनशैलीत वापरलेल्या गेलेल्या यंत्रसामुग्रीच्या बाबतीतही आलेला दिसतो. संगणकाशिवाय जीवन जगता येऊ शकेल यावर आजकाल कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. पण बिघडलेले संगणक कोठे टाकायचे व कसे नष्ट करायचे हा मोठा कूट प्रश्‍न आहे. भगवान श्री शंकरांचा तृतीय नेत्र उघडून संपूर्ण पृथ्वीचा विनाश करता येईल अशी शक्‍ती आणि अणुशक्‍ती ह्यांचेही काही साधर्म्य दिसते. परंतु अणुशक्‍ती तयार करत असताना वापरलेली संयुगे नंतर कोठे टाकायची व कशी नष्ट करायची हा एक मोठा प्रश्‍न आहे. रोजच्या जीवनात खाल्लेल्या वस्तू खाताना गोड वाटल्या व माणसाला चैन करताना आनंद वाटला पण त्यानंतर त्यातून तयार होणार आमरूपी विष कसे पचवाचे वा त्याचा निचरा कसा करायचा हा एक मोठा प्रश्‍न असतो.
घृतपानाचा उपचार
ज्या ठिकाणी हे आमरूपी विष शरीरात जाईल, त्या ठिकाणी त्या अवयवाचा आजार येऊन तो अवयव नष्ट करण्याची प्रक्रिया जरी एका ठिकाणी सुरू होत असली तरी हलके हलके हे विष सर्व शरीर व्यापून टाकते आणि जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विषाचे व्यवस्थापन हा आयुर्वेदाचा सर्वात मोठा विषय, सर्वात मोठी उपलब्धी आहे. जणू ह्या विषाच्या व्यवस्थापन प्रक्रियेत आयुर्वेदाचा हातखंडा तर आहेच, पण या विषयाचा विचार करणारे आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे असे दिसून येते. शरीरात जमलेले विष पंचकर्माद्वारे काढून टाकणे ह्याला आयुर्वेदिक उपचारामध्ये मोठे महत्त्व दिसते. एकदा का शरीर शुद्ध झाले की त्याला शिवत्व प्राप्त होते, तेजःपुंज अशी प्रभा मिळते. याने नुसतेच शरीर शुद्ध होते असे नव्हे, तर मनात येणारे विषारी विचारसुद्धा कमी होतात. अशा प्रकारे विष काढून टाकण्यासाठी आयुर्वेदीय पंचकर्माच्या प्रयोगात सर्वप्रथम पूर्वकर्म करून शरीरात साठलेल्या विषाला एकत्रित आणून मार्गी करावे लागते आणि त्यानंतर विशेष योजनेद्वारे शरीराच्या बाहेर काढले जाते. यासाठी बाष्पस्वेदन, अभ्यंग, विरेचन वगैरे विधींचा प्रयोग केला जातो. शरीरात कुठेही जमलेले आमविष प्रथम त्या ठिकाणाहून मुख्य प्रवाहात आणून बाहेर काढावे लागते. घृतपानामुळे म्हणजे अंतर्स्नेहनामुळे शरीरातील विषद्रव्ये सुटी तर पडतातच, परंतु बऱ्याच प्रमाणात त्यांचा प्रभाव नष्ट होतो. सर्पदंश झाल्यावर शरीरात आलेल्या विषावर पण सर्वप्रथम तूप पाजण्याचा खूप उपयोग होतो. उंदीर वा कुत्र्यासारखा प्राणी चावल्यास सर्वप्रथम घृतपान करावे असे सांगितलेले आहे.
निर्विषीकरण करणारे स्वयंपाकघर
आयुर्वेदिक औषधे बनविण्याची प्रक्रिया, त्याचा कारखाना वा एकूणच आयुर्वेदीय संकल्पना म्हणजे काय असे कोणी विचारले, तर त्याचे सोप्यात सोपे उत्तर म्हणजे आयुर्वेदीय औषधे बनविण्याचा कारखाना म्हणजे एक स्वयंपाकघरच असते व यात केलेली मुख्य क्रिया असते निर्विषीकरण. अगदी पाऱ्यासारखा धातू, नागाचे विष अशा द्रव्यांचा औषधी उपयोग करण्यापूर्वी त्यांचे निर्विषीकरण करण्यात आयुर्वेदाचा हातखंडा आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये सर्व प्रकारचे धातू तर वापरले जातातच ,पण कुचल्यासारखे विषही आयुर्वेदात वापरलेले दिसते.
भगवान श्री शंकरांच्या गळ्याभोवती तर सर्प असतोच, पण त्यांच्या सर्व शरीरावर सर्प फिरत असतात. सर्प हा शरीराने थंड असतो, त्याच्यात सर्व उष्णता व त्यात असलेले विष सापाच्या एक पिशवीत एकवटलेले असते. विषामुळे उष्णता वाढते आणि वाढलेली उष्णता सर्वच इंद्रियावयवांना घातक असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शरीर व मन शांत ठेवण्याचा संकल्प करून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहे. ह्यातून थंडाई पिण्याची पद्धत रूढ झाली असावी. अर्धा कप दूध घेतल्यास शरीरातील पित्ताचे शमन होऊन शरीर शांत होऊ लागते. यासाठीच श्री शंकरांना दुधाचा अभिषेक प्रिय असावा. ह्याचबरोबरीने शंकर ही कलेची देवता असून त्यांच्या हातात असलेल्या डमरूमुळे त्यांचा ताल व नादाशी असलेला संबंध समजून येतो. संगीताद्व्रारे शरीराचे तापमान, मनाची चंचलता, राग व उच्छृंखलपणा कमी करता येऊ शकतो, त्या दृष्टीने आरोग्य देणारे संगीत – स्वास्थ्यसंगीत – जीवनसंगीत हे आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरते.
ध्यानासाठी नको भांग
भांग ही एक प्रकारची वनस्पती आहे. भांगेचा एक मोठा दोष म्हणजे ती स्मृतीचा एक लूप म्हणजे चक्र तयार करते. त्यामुळे भांग घेतल्यावर मनुष्य त्या न्‌ त्याच ठिकाणी विचार करत राहतो. भांग घेतलेला मनुष्य बसला तर बसून राहतो, हसायला लागला तर हसतच राहतो. भांगेच्या ह्या गुणामुळे अनेकांचा असा समज असतो की भांग घेऊन ध्यानाला बसले तर ध्यान चांगले लागते, पण अशा वेळी साक्षीभाव हरपलेला असल्याने अशा ध्यानाचा काही उपयोग नसतो.
भांगेत असलेल्या स्तंभन ह्या गुणाचा उपयोग करून घेण्यासाठी आयुर्वेदाने तिची शुद्धी करण्याचे मार्गदर्शन केलेले आहे. याप्रमाणे शुद्ध केलेली भांग ही मनाची चंचलता दूर करण्यासाठी किंवा स्तंभनासाठी उपयोग करून घेता येतो. शुद्ध केलेली भांग वापरल्यास भलते विचार मनात येणे, भलती दृश्‍ये दिसणे, एकाच चक्रात मनाला फिरत ठेवणे हे दोष टाळता येतात. एकूणच औषधीकरणामध्ये त्यात वापरलेल्या घटकद्रव्यांचे दोष म्हणजेच विष काढून टाकल्यामुळे आयुर्वेदिक औषधांचा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. दुधासारखा पदार्थही अति मात्रेत सेवन केला तर जुलाब-उलट्या होऊ शकतात. तसेच आयुर्वेदिक औषधांची मात्रा व वेळ सांभाळली नाही तर काहीसा त्रास होऊ शकतो, पण असा त्रास माणसाला मृत्यूकडे घेऊन जात नाही.
येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने शरीर, मन शांत ठेवून शरीरातील विषद्रव्ये व मनातील विषारी विचार दूर करून नैतिकता पाळून सत्याच्या मार्गावर चालले तर “सत्यं शिवं सुन्दरम्‌’चा अनुभव नक्‍कीच घेता येईल.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments: