Search This Blog

Saturday 26 February 2011

कमी दिसणे, Eye Problems

डॉ. ह. वि. सरदेसाई
आपल्या दृष्टिदोषाकडे व्यक्ती कसे लक्ष देते, यावर दृष्टिदोषामुळे होणारा त्रास ठरतो. नजर कमी झाली असली तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात फारशी अडचण न येता सगळे आयुष्य व्यवस्थित कंठणाऱ्या व्यक्ती समाजात असतात.
कमी दिसणे हा त्रास विविध कारणांमुळे होऊ शकतो. अपघात, आजार अथवा दोष यामुळे दृष्टिदोष जडू शकतो. जन्मत: असू शकतो किंवा कोणत्याही वयात होऊ शकतो. अकस्मात येऊ शकतो किंवा हळूहळू वाढत जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या कामाला नजरेची आवश्‍यकता असते. आपल्या कामाला आवश्‍यक त्या नजरेचा अभाव असला तर तो दृष्टिदोष म्हटला जातो. चांगली नजर असण्याकरता प्रथमत: पुरेसा उजेड असावा लागतो. प्रकाशाचे किरण डोळ्यांत जावे लागतात. डोळ्यांच्या मागच्या प्रकाशकिरणांचा परिणाम होऊ शकेल असा संवेदनाक्षम भाग- नेत्रपटल असावा लागतो.
या नेत्रपटलातील पेशींमध्ये प्रकाशकिरणांनी उद्दीपित होणारे स्वीकारक असावे लागतात. या स्वीकारकांचे कार्य म्हणजे प्रकाशकिरणांमुळे प्राप्त झालेल्या उद्दीपनाचे रूपांतर विद्युतशक्तीत करणे, हे होय. ही विद्युतशक्ती डोळ्याकडून मेंदूकडे ऑप्टिक (Optic) नावाची मज्जातंतूची शीर नेते. यात कोठेही अडथळा असला तर दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. माणसाला दिसू शकत नाही. न दिसण्याच्या कारणांपैकी सर्वांत अधिक वेळा असणारे कारण म्हणजे मोतीबिंदू होणे, हे आहे. डोळ्याच्या आतील भिंग अपारदर्शक होणे म्हणजे मोतीबिंदू होणे होय. दुसरे कारण म्हणजे काचबिंदू (ग्लॅकोमा glaucoma) होणे. डोळ्यांच्या आत दाब असतो. ती वाढला, की डोळ्यांतील संवेदनाक्षम शिरांवर दाब येतो. या दाबामुळे या शिरा अकार्यक्षम होतात. याला काचबिंदू म्हणतात. डोळ्यांच्या समोर पारदर्शक पटल असते. त्याला कॉर्निया (cornea) म्हणतात. प्रकाशाचे किरण कॉर्नियातून डोळ्यांत प्रवेश करतात. कॉर्नियावर ओरखडे पडले की तो अपारदर्शक होतो. असे होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे खुपऱ्या (ट्रॅकोमा Tracoma) नावाचा आजार, हे होय. काही जिवाणूंमुळे आपल्या पापण्यांचा आतल्या बाजूला असणाऱ्या अस्तरावर हा आकार होतो. परिणामी ही बाजू खडबडीत होते. कॉर्नियावर घासत राहते. झालेल्या जखमा भरून निघताना कॉर्नियाच्या दुसऱ्या पारदर्शक पेशींच्या ऐवजी अपारदर्शक व्रण निर्माण होतात. मधुमेह हे दृष्टी जाण्याचे एक महत्त्वाचे कारण सर्वत्र आहे. मधुमेहाचा डोळ्यांवर विविध प्रकारचा अपाय होतो व नजर अधू होऊ शकते. त्यात सर्वांत महत्त्वाचा दुष्परिणाम नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम होय. आहारातील दोषांचादेखील डोळ्यांवर परिणाम होतो. आहारात जीवनसत्त्व अचा अभाव होण्याने कॉर्निया अपारदर्शक होतो व नेत्रपटलातील पेशींचे कार्य नीट न झाल्याने रातांधळेपण येते.
लहान मुलांना दृष्टिदोष होण्याचे कारण बहुतेक वेळा जन्मतः असणाऱ्या दोषात असते. मुलांच्या नेत्रपटलात दोष असू शकतात. लहान मुलांना (जन्मत:सुद्धा) मोतीबिंदू होऊ शकतो. मातेला गर्भवती असताना झालेल्या आजारांचे परिणाम गर्भाच्या डोळ्यांवर होऊ शकतात. (उदाहरणार्थ, जर्मन मीझलम : रुबेला (rubella), ट्राक्‍झोप्लाझ्मोसिस नावाचा आजार) किंवा डोळ्यांकडून मेंदूकडे माहिती नेणारी ऑप्टिक शीर हिची वाढ नीट न झाल्याने ती शीर अकार्यक्षम होते. ऑप्टिक ऍट्रॉफी (Optic atroph) लहान मुलांमध्ये सहा टक्के बालकांच्या डोळ्याला ऍम्लिओपिया (ambliopia) नावाचा दोष होतो. याला “आळशी डोळा’ म्हणतात. सहसा एकाच डोळ्यात नजर कमी होते. योग्य उपचार वेळेवर झाले तर हा दोष दुरुस्त होतो.
प्रौढ व्यक्तींमध्ये मधुमेहाने नेत्रपटलावर आलेला अपाय हे दृष्टिदोषाचे महत्त्वाचे कारण असते, हे आपण तर पाहिले आहेच. मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे आणि 2020 मध्ये भारत “मधुमेहाची राजधानी’ बनेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. म्हणजे, जगात भारतात सर्वांत अधिक लोकांना मधुमेह झाल्याचे आढळेल. यामुळे नजर गमावण्याचा धोकाही वाढेल, याकडे ध्यान दिले पाहिजे. मधुमेहाखेरीज दृष्टिदोष होण्याची इतरही कारणे असतात. ऱ्हस्व दृष्टी ( myopia) हे कारण लहान वयापासून असू शकते. अशा रुग्णांना नेत्रपटल आपल्या जागेवरून सुटण्याने नजर जाण्याचा धोका जास्त असतो (detachement of retina). रेटिनायटिस पिगमेंटोझा (retinitis pigmentose) हा विकार आनुवंशिक असतो. वयाच्या तिशी-पस्तिशीमध्ये रुग्णाला आजार झाल्याचे उमजते, परंतु हा दोष मातेकडून आलेल्या जनुकीय दोषांतच असतो. नेत्रपटलातील दोषामुळे या रुग्णांना “बोगद्यातून पलीकडे’ पाहण्यासारखी दृष्टी येते व कालांतराने पूर्ण नजर जाते. त्या व्यक्तींचा रक्तदाब वाढलेला असतो. त्यांच्या रक्तवाहिन्यांत दोष होऊ लागतात. असे दोष नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांत झाल्यास नजरेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे “उच्च रक्तदाब’ असणे हे दृष्टी जाण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. ऑप्टिक नर्व्हवर सूज येते, तेव्हा ऑप्टिक न्यूरायटिस नावाचा आजार होतो. या आजारातदेखील नजर जाते. आपला डोळा हे एक नाजूक इंद्रिय आहे. डोक्‍याला इजा झाली तर दीर्घ काळ नजरेवर विपरीत परिणाम होणे शक्‍य आहे.
वार्धक्‍यामध्ये काही प्रमाणात नजर कमी होणे, ही एक नेहमी आढळणारी घटना होय. इतर कोणत्याही वयोगटापेक्षा वयाच्या 65 वर्षांनंतरच्या वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये दृष्टिदोष होण्याचा संभव जास्त असतो. या व्यक्तींना “एज रिलेटेड म्यॅक्‍युलर डी-जनरेशन’ (age related macular degeneration) नावाचा विकार जडतो. आपल्या नेत्रपटलात “मॅक्‍युला’ (macula)नावाचा एक भाग असतो. येथे आपल्याला सर्वांत स्पष्ट नजर मिळते. या भागातील पेशी अकार्यक्षम होतात. आजार हळूहळू वाढत जातो. अखेर अगदी परिचयाचे चेहरेदेखील ओळखता येत नाहीत. उपरीनिर्दिष्ट मोतीबिंदू आणि काचबिंदू या वयातदेखील होतातच. किंबहुना वयाच्या 65 नंतर बहुतेक सर्वांच्या डोळ्यातील भिंगात काही प्रमाणात मोतीबिंदूची सुरवात झाल्याचे आढळते, परंतु दृष्टिदोष होतोच असे नाही.
आपल्या दृष्टिदोषाकडे व्यक्ती कसे लक्ष देते, यावर दृष्टिदोषामुळे होणारा त्रास ठरतो. नजर कमी झाली असली तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात फारशी अडचण न येता सगळे आयुष्य व्यवस्थित कंठणाऱ्या व्यक्ती समाजात असतात. या नाण्याची दुसरीही बाजू लक्षात घेतली पाहिजे. जन्मभर चांगली नजर असणाऱ्या व्यक्तीला अकस्मात दृष्टिदोष निर्माण झाला तर या अडचणीला तोंड देणे म्हणजे मोठेच संकट आल्याचे भासते. दृष्टिदोष झालेल्या व्यक्तींनी आपापल्या डॉक्‍टरांच्या नजरेखाली राहावे. शास्त्रात बरीच प्रगती होत आहे. नवे शोध लागत आहेत. अनेक व्याधींवर नवे नवे उपचार सापडत आहेत. कमी दिसणाऱ्या व्यक्तीने आपल्या परिसरात पुरेसा उजेड येण्याची दक्षता अवश्‍य घ्यावी. अनोळखी ठिकाणी जाताना परिचयाच्या व्यक्तीची मदत अवश्‍य घ्यावी. दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था समाजात असतात. त्यांचीही खूप मदत होऊ शकते. प्रगत देशात “गाइड डॉग्स’ म्हणजे सोबत करणारे प्रशिक्षित कुत्रे मिळण्याची सोय आहे. त्याचा अनेकांना तिथे फायदा होतो. आपल्याकडे ही पद्धत अद्याप रुळलेली नाही, परंतु आपली समाजव्यवस्था अधिक जवळकीने बांधलेली आहे, त्यामुळे अशा मदतीची अद्याप गरज भासलेली नाही. नजर कमी असणाऱ्या व्यक्तींवर एकटे राहण्याची पाळी क्वचितच येते. मदत करणाऱ्या संस्था “ब्रेल’ (Braille) लिपी कशी वाचावयाची, याचे शिक्षण देतात, त्यामुळे अशा व्यक्तींना वाचता येते.

No comments: