Search This Blog

Wednesday 16 March 2011

प्रिय मित्रा रे सवंगड्या

प्रिय मित्रा रे सवंगड्या

बालपणीच्या बालसख्या

असा कसा रे पडला मला

सांग तुझा रे विसर कसा
तूच दिली मज कैरी बोरे

आणि कधीतरी कांदा पोहे

तू शबरी अनं तूच सुदामा

भुलली कशी रे तुला गुलामा
जमवुनी साऱ्या आट्या-पाट्या

लंगडी-लपंडाव आणि गोट्या

कधी माळावर मुक्त हिंडलो

कळी काढुनी कधी मस्त भांडलो
छत्री तुझी ती होती मजला

ऊन पावसापासून रक्षण

तुझ्याच पाठीवरी लोटले

माझ्याच दप्तराचे काही क्षण
बघता बघता मोठी झालो

गांव सोडूनी शहरी निघाले

नांव कीर्तिच्या नादी लागुनी

मूर्ख खेळात मग्न राहीले
प्रपंचाच्या मग गाड्याखाली

नाती आपुली धुसर झाली

वर्षामागुनी वर्षे गेली

परी कधी न आपुली भेट जाहली
नाही पत्र नाही चिठ्ठी

नच झाल्या कधी भेटी-गाठी

एके दिवशी तारच आली

“CHANDU IS NO MORE”
तार वाचली धरणी कापली

आसवांची मग नदी वाहिली

जड मनावर दगड ठेवूनी

दोन तपांनी गावची वाट पाहिली
चंदयाची मग डायरी चाळली

धक्याने जणू धरणीला खिळली

चंदयाची चिता माझ्याच शहरात

हाकेच्या अंतरावर निवांत जळाली?
मैत्रिचे हे धागे सारे

विणतो कोण कोणास ठावे

काही कच्चे काही पक्के

परी गुंता मात्र शंभर टक्के

No comments: