Search This Blog

Saturday, 26 February 2011

विषनिवृत्ती

विषनिवृत्ती

डॉ. श्री बालाजी तांबे
भगवान शंकर विषातील विषत्वाचा नाश करून ते कंठात धारण करू शकतात; तसेच आयुर्वेदातही अनेक द्रव्यातील विषत्वाचा नाश करून त्यातल्या औषधी गुणाला अधिक सारवान बनविण्याचे अनेक उपाय सुचवले आहेत. भगवान श्री शंकरांनी भांग, धोतरा वगैरे विषारी द्रव्यांना आपलेसे केले, यावरूनच त्यांच्यात काही ना काही उपयुक्‍तता असणार हे लक्षात येऊ शकते. या द्रव्यांच्या आहारी न जाता त्यांच्यातले गुण पारखून घेतले, आयुर्वेद शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यांची व्यवस्थित शुद्धी करून घेतली तर त्यामुळे आरोग्यरक्षण होण्यास, रोगनिवारण होण्यास नक्कीच मदत मिळेल.
आयुर्वेदाला “अष्टांग आयुर्वेद’ असेही म्हटले जाते. कारण आयुर्वेदाचे मुख्य आठ विभाग आहेत. या आठ विभागांपैकी एक विभाग आहे “अगदतंत्र’. “गद’ या शब्दाचा अर्थ “रोग’, तसेच “विष’ असा आहे. म्हणूनच अगद म्हणजे असे औषध किंवा अशा प्रक्रिया ज्यामुळे रोग दूर होतील, विषत्व दूर होईल. अगद तंत्रामध्ये विषाचा प्रतिकार करण्याबद्दल, विषबाधा झाल्यास विषाचा परिणाम दूर करण्याबद्दल, विषपरीक्षण करण्याबद्दल अनेक उपाय, अनेक औषधे समजावलेली आहेत.
विषाची उत्पत्ती कशी झाली याची कथा चरकसंहितेत दिलेली आहे. देव व दैत्यांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, तेव्हा अमृत उत्पन्न होण्यापूर्वी विष उत्पन्न झाले, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये विषाद उत्पन्न झाला. “विषाद उत्पन्न करणारे ते विष’ अशा प्रकारे “विष’ ही संज्ञा प्रचलित झाली. भगवान श्री शंकरांनी हे विष प्राशन करून गळ्यामध्ये धरून ठेवले आणि समस्त सृष्टीचा विषाद नष्ट केला. या कथेचा उत्तरार्ध भारतीयांना परिचित आहेच. भगवान शंकर विषातील विषत्वाचा नाश करून ते कंठात धारण करू शकतात, तसेच आयुर्वेदातही अनेक द्रव्यातील विषत्वाचा नाश करून त्यातल्या औषधी गुणाला अधिक सारवान बनविण्याचे अनेक उपाय सुचवले आहेत.
विषही गुणकारी, पण ….
विष म्हटले की ते वाईट, अनारोग्यकर, क्वचित मृत्यूकर समजले जाते; पण आयुर्वेदात विषाचेही गुण दिलेले आहेत.
तत्सामान्यगुणा उपपत्तिं च, लघुरुक्षमाशु, विशदं, व्यवायिं, तीक्ष्णं, विकासि, सूक्ष्ममुष्णम्‌, अनिर्देश्‍यरसम्‌ ।…चरक चिकित्सास्थान
विष गुणाने हलके, कोरडे, चटकन क्रिया करणारे, स्वच्छ करणारे, तीक्ष्ण, उष्ण, शरीरातील लहानातल्या लहान पोकळीत प्रवेश करू शकणारे, शरीरात प्रवेशित झाल्यावर संपूर्ण शरीराला व्याप्त करणारे असे असते. विषाची चव अव्यक्‍त असते. योग्य स्वरूपात, योग्य मात्रेत योजना केली असता, विषही या सर्व गुणांच्या योगे शरीरोपकारक ठरू शकते. आयुर्वेदात अनेक विषांचा औषधात समावेश केला आहे. अर्थातच, औषधात वापरण्यापूर्वी या द्रव्यांची शुद्धी करणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात प्रत्येक विषद्रव्याची कशा प्रकारे शुद्धी करावी हे समजावलेले आहे. यातील सर्वाधिक वापरात असणाऱ्या काही विषद्रव्यांची शुद्धी व त्यांचे उपयोग याप्रमाणे सांगता येतील.
भांग - विष अन्‌ औषधही
भांग – भांग हे विषद्रव्य आहे हे सर्वज्ञात आहेच. भांगेचे व्यसनही लागू शकते, मात्र काही आयुर्वेदिक औषधात शुद्ध केलेली भांग वापरली जाते.
भांगेची शुद्धी – गाईच्या दुधात भांगेची पाने अडीच तास उकळावीत, नंतर पाण्याने धुवून घ्यावीत, वाळवावीत. ही वाळवलेली पाने मंद अग्नीवर तुपावर भाजून घेऊन औषधात वापरावीत. महाशिवरात्रीला भांग पिण्याची पद्धत रूढ आहे, भांग ही मदकारक असते, पण भांगेत अनेक औषधी गुणधर्मही असतात.
भंगा कफहरी तिक्‍ता ग्राहिणी पाचनी लघुः ।तीक्षोष्णा पित्तला मोहमदवाग्वविर्धनी ।।…भावप्रकाश
भांग कफदोषनाशक, चवीला कडू, पचण्यास हलकी, गुणाने तीक्ष्ण व उष्ण, पित्तकारक,मोह-मद वाढविणारी व अग्नी वाढवणारी असते.
भांग गुणाने लघु, तीक्ष्ण व रुक्ष असते. चवीने कडू असते तर वीर्याने उष्ण असते. भांगेचा परिणाम मेंदूवर होतो. भांगेमध्ये वेदनाशमनाचेही गुणधर्म असतात म्हणून योग्य प्रमाणात वयोग्य तऱ्हेने म्हणजे शुद्ध केलेल्या भांगेची औषधात योजना केली असता डोकेदुखी, सांधेदुखी, वातविकारांमुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. योग्य प्रमाणात दिली असता भांग वातशमनाचेही कार्य करू शकते.
भांग निद्राजनक असते. झोप कमी, अस्वस्थ किंवा अजिबात न लागणे यासारख्या तक्रारींवर भांगेची योजना करता येते. भांगेच्या पानांची धुरी मूळव्याध, गुदभ्रंश वगैरे विकारांवर देतात. त्वचारोग, जखम वगैरेतील कृमींचा नाश करण्यासाठी भांगेच्या पानांचा रस उत्तम असतो. भांग अग्निदीपनासाठी उत्तम असते, पचनास मदत करते, भूक नीट लागावी, यकृताचे कार्य व्यवस्थित चालावे , पोटदुखी, पोट जड होणे यासारख्या तक्रारी दूर होण्यासाठी भांग वापरता येते.
भांगेचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे “मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणे’. जुलाब, आव, ग्रहणी वगैरे विकारांमध्ये भांग हा एक घटकद्रव्य असणारी औषधे उपयुक्‍त असतात.
भांग हे शुक्रस्तंभनासाठीही वापरली जाते. शीघ्रपतन, मैथुन असमर्थता वगैरे तक्रारींमध्ये भांगेची योजना केली जाते. मात्र अति प्रमाणात किंवा दीर्घकाळ भांगेचे सेवन केल्यास मैथुनेच्छा कमी होऊ शकते.
भांगयुक्‍त औषधे शरीरात चटकन पसरणारी असल्याने लगेच गुण देणारी असतात, पण अशी औषधे दीर्घकाळ घेत राहणे एकंदर आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. भांग अशुद्ध स्वरूपात किंवा अति प्रमाणात सेवन केली असता चक्कर येणे, त्वचा बधिर होणे, डोळ्यांवर झापड येणे यासारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात. भांगेमुळे मद उत्पन्न झाला तर बडबड, असंबद्ध भाषण, अतिनिद्रा वगैरे लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. भांगेमुळे विषबाधा झाली तर त्याचा दृष्टीवर व मेंदूवर कायमचा दुष्परिणामही होऊ शकतो.
जंतुघ्न धोतरा
महादेव शंकारांशी संबंधित अजून एक रुढार्थाने विषारी मात्र शुद्धी केल्यानंतर औषधात वापरली जाणारी वनस्पती म्हणजे धोतरा. धोतऱ्याला संस्कृतमध्ये शिवशेखर, शैव, शिवप्रिय, हरवल्लभ अशी पर्यायी नावे सुद्धा आहेत. धोतरा तुरट, मधुर व कडू रसाचा, उष्ण वीर्याचा आणि मादक गुणधर्माचा असतो. धोतऱ्याच्या बिया औषधी असतात. धोतऱ्याचे बी गोमूत्रात आठवडाभर भिजत ठेवल्याने शुद्ध होते. शुद्धी न करता धोतऱ्याचे बी वापरले असता ते विषारी असते, मात्र शुद्धीनंतर यापासून बनविलेली औषधे दम्यावर उपयोगी असतात. दम्यामध्ये येणाऱ्या वेगांची (अटॅकची) तीव्रता कमी करू शकतात. मैथुनशक्‍ती वाढवण्यासाठीही धोतऱ्याच्या बिया वापरल्या जातात. थंडी भरून पाळीचा ताप येतो, त्यावर ताप येण्यापूर्वी योग्य मात्रेत धोतऱ्याचे शुद्ध केलेले बी दह्याबरोबर दिल्यास थंडी वाजण्याचे प्रमाण कमी होते. तसेच तापामुळे अंग दुखणेही कमी होते.
वात किंवा कफदोषांमुळे सूज येते त्यावर धोतऱ्याच्या पानांचा रस लावल्यास सूज कमी होते. धोतऱ्याची पाने जंतुघ्न गुणधर्माची असतात. “सूतशेखर’ या पित्तावरच्या प्रसिद्ध औषधात धोतऱ्याच्या शुद्ध केलेल्या बियांचा समावेश असतो.
भांग, धोतऱ्याच्या बिया, गुंजा, बचनाग, कण्हेरीचे मूळ, कुचला यासारखी वनस्पती द्रव्ये किंवा हरताळ, मनःशीला, पारद यासारखी खनिज द्रव्ये उपविष म्हणून ओळखली जातात, ज्यांचे अशुद्ध स्वरूपात, अयोग्य मात्रेत सेवन करण्याने विषबाधेची लक्षणे निर्माण होऊ शकतात.
आयुर्वेदाने मात्र या व अशा इतर अनेक द्रव्यांवर निरनिराळे संस्कार करून त्यांची शुद्धी करण्याचे तंत्र शोधून काढले आणि त्यातील विषत्वामुळे नुकसान होणार नाही उलट उपयोगच होईल, त्या द्रव्याची उपयुक्‍तता अजूनच वृद्धिंगत होईल अशी योजना केली.
आयुर्वेदिक औषधांची शुद्धिप्रक्रिया समजावी म्हणून आणि महाशिवरात्र जवळ आली असल्यामुळे भांग, धोतरा वगैरे द्रव्यांची माहिती देऊन त्यांचे औषधी उपयोग समजावले आहेत. भांग वगैरे बाजारात विकणे, विकत घेण्यास किंवा लागवड करण्यास परवानगी नसते. अशी द्रव्ये औषध म्हणून वापरण्यापूर्वी विशेष परवान्यांची आवश्‍यकता असते व ती जपून वापरावी लागतात.
भगवान श्री शंकरांनी भांग, धोतरा वगैरे विषारी द्रव्यांचा आपलेसे केले यावरूनच त्यांच्यात काही ना काही उपयुक्‍तता असणार हे लक्षात येऊ शकते. या द्रव्यांच्या आहारी न जाता त्यांच्यातले गुण पारखून घेतले, आयुर्वेद शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यांची व्यवस्थित शुद्धी करून घेतली तर त्यामुळे आरोग्यरक्षण होण्यास, रोगनिवारण होण्यास नक्कीच मदत मिळेल.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments: