रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
गर्दीत नेहमी घाईत दिसायच्या
सतत एकमेकींना शोधत फिरायच्या
नजर भिडली की हायस हसायच्या
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
एक नुकतीच त्यातली लग्न झालेली
तर दुसरीन आत्ताच पन्नाशी ओलांडलेली
मैत्रिणी नक्कीच नव्हत्या अन
आई - मुलीची ना खूण पटलेली
ओलावा परी तोच, त्यांच्या नात्याचा ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
कधी पिशवीतून आणलेले बेसनाचे लाडू
कधी स्टीलच्या डब्यातली पुरणपोळी
कधी गरम गरम केलेला गाजराचा हलवा
तर कधी कागदात नुसतीच लिंबाची गोळी
बाकावर एकमेकींना, मग प्रेमाने भरवायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
.
.
.
आज ती स्टेशनवर एकटीच दिसली
रोजच्या बाकावर जाऊन शांत बसली
ना शोधाशोध ना घाई कसली
लोकलमधेही कशी निमूट चढली
आज नाही सोबत, जशा नेहमी असायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
बरेच दिवस रोज मग हाच प्रकार
मनात माझ्या तेव्हा शंका हजार
न राहवून शेवटी मी विचारलं तिला
तिचे ते उत्तर आणि मी लाचार
.
.
.
" माझ्या माहेरी त्या शेजारी रहायच्या "
" आईन दिलेलं आणून मला द्यायच्या "
" आता कधीच नाही तुम्हाला दिसणार त्या "
" आता कधीच नाही स्टेशनावर येणार त्या "
.
.
.
तिचे ते बोल तिच्या हुंदक्यात विरले
डोळ्याकडे जाता पदर सारे मला कळले
तिच्या त्या वाक्याने आज गहिवरले
नात्यावीण नात्याचे गुज आज कळले
आता कधीच दिसणार नाही त्या, जशा नेहमी दिसायच्या ...
रोज त्या दोघी तेव्हा स्टेशनवर भेटायच्या ...
No comments:
Post a Comment