Search This Blog

Sunday, 27 February 2011

कथा काँग्रेसची





sonia-gandhi.jpg
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या इंदिरा काँग्रेस या भारतामधल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्या 125 व्या वर्षात पदार्पन केलंय. 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईत या पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. गेल्या 125 वर्षात या पक्षाने देशाच्या इतिहासात एक न पुसता येणारे स्थान निर्माण केले आहे.
सुरवातीचा काळ भारताचा 125 वर्षांचा इतिहास लिहीत असताना काँग्रेसला टाळून हा इतिहास लिहणे शक्य नाही.1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. हा काळ मोठा गुंतागुंतीचा होता. इंग्रजी शिक्षण घेऊन तयार होणारी एक सुशिक्षत भारतीयांची पिढी या देशात तयार होत होती. या वर्गाच्या अंसोतषाला योग्य प्रकारे रस्ता देणं आवश्यक आहे. हे चाणाक्ष ब्रिटीश राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं.त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलेन ह्युम या निवृत्त सनदी अधिका-यांच्या पुढाकाराने झाली. सुरवातीच्या काही अधिवेशनात ब्रिटीश राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबध ठेवावे असेच मत त्यावेळी काँग्रेस पक्षातल्या बहुतेक नेत्यांचे होते. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनालाही हजेरी लावली होती.न्या. रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी या सारख्या विलक्षण व्यक्तींचे सुरवातीच्या काळात पक्षावर वर्चस्व होते. ब्रिटीश राज्यकर्त्यांशी संघर्ष न करता चर्चेच्या माध्यमातून भारतीयंचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे मत यापैकी बहुतेक नेत्यांचे होते. काँग्रेसच्या राजकारणात प्रसिद्ध झालेला हाच तो मवाळ गट. ब्रिटीशांची राजवट ही हिंदूस्थानला मिळालेले वरदान आहे. असेही यापैकी अनेकांचे मत होते. या नेत्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाचे स्थान समाजातल्या काही वर्गांपुरतेच मर्यादीत होते. हा पक्ष ख-या अर्थाने लोकचळवळ बनला तो टिळकयुगात.
टिळकयूग---लोकमान्य टिळकांवर त्यांच्या विरोधकांनी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी अशी टिका केली होती. पुढे हेच विशेष टिळकांची ओळख बनली. कोणताही अन्य व्यवसाय न करत केवळ राजकारण करणारे व्.यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. काँग्रेसच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला त्यांनी आपल्या काराकिर्दीत वेगळी दिशा दिली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला टिळकांनी आपल्या लेखणीतून आणि कार्यातून ख-या अर्थाने वाचा फोडली. भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांनी काँग्रेसला लढाऊ आणि समर्थ बनवले. 1907 च्या सुरत अधिवेशनात ज्येष्ठ मवाळ नेत्यांच्या दडपणाला त्यांनी जुमानले नाही. जहाल आणि मवाळ अशी काँग्रेसची विभागणी या अधिवेशनात झाली.

1905
मध्ये करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीला टिळकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. धर्माच्या नावावर बंगालची फाळणी करण्याचा ब्रिटीश सरकारच्या राजकारणावर त्यांनी सा-या देशात रान उठवले. लाल-बाल-पाल या त्रिमुर्तींच्या नेतृत्वाखाली सारा भारत देश एकत्र आला. भारतीय जनमानसाच्या या अभूतपूर्व रेट्यांमुळे ब्रिटीश सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले. 1911 साली बंगालची फाळणी ब्रिटीशांनी रद्द केली. काँग्रेसच्या चळवळीला मिळालेलं हे पहिले मोठं यश होतं. 1907 मध्ये काँग्रेसची विभागणी झाली असली तरी त्यानंतर 1916 मध्ये काँग्रेसच्या सर्व गटाचे एकत्रिकरण करण्यामध्ये टिळकांचा पुढाकार होता. टिळकांच्याच पुढाकाराने जहाल-मवाळ आणि अगदी मुस्लिम लिग देखील राष्ट्रीय सभेच्या झेंड्याखाली एकत्र आली. मुस्लिम लिगचे नंतरच्या काळातील सर्वेसर्वा आणि भारतीय फाळणीचे खलनायक महंमद अलि जिना हेही कट्टर टिळकभक्त होते. टिळकांनी आपल्या शेवटच्या काळात होमरुल चळवळीची स्थापना केली. स्वराज हा जन्मसिद्ध हक्क आहे असे ब्रिटीश साम्राज्याला निक्षणुण सांगणा-या लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 या दिवशी निधन झाले. भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले. गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली.
गांधीयूग ---विसाव्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओखख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी, सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार अस्त्रांनी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले.
मुस्लिमांचे तृष्टीकरण करण्याची काँग्रेसला सवय लावली तीही गांधीजींनी...तुर्कस्थानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खिलाफत चळवळ सुरु केली. काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांचे जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्वन त्यांनीच वाढवले. 'हम करे सो कायदा ' ह्या गांधी घराण्याच्या खास कल्चरचा पायाही त्यांनीच रचला. आपल्या नेतृत्वाला धोका निर्माण करु शकणारे सुभाषचंद्र बोस आणि महंमद अली जिना हे दोन नेते त्यांनी काँग्रेसच्या राजकारणातून दूर केले.
गांधीच्या आणि काँग्रेसच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे पुणे करार. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन भारताचे आणखी एक विभाजन करण्याचा डाव ब्रिटीशांनी रचला होता. ब्रिटीशांच्या या धूर्त डावपेचाविरुद्ध गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले. अखेर गांधीजीच्या नैतिक दबावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान राखला. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी गांधीजी आणि आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये पुणे करार करण्यात आला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ द्यावे. या बाबीवर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. गांधीजींनी या बाबत आग्रही भूमिका घेतली नसती तर दलित समाज मूळ प्रवाहातून बाहेर काढण्याचा ब्रिटीशांचा हेतू साध्य झाला असता. अर्थात गांधीजींची ही आग्रही भूमिका मुस्लिम लिगच्या बाबतीत कायम राहू शकली नाही.
फाळणी आणि गांधीहत्या --लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणा-या पंडित नेहरुंच्या काँग्रेसनेच फाळणीला संमती दिली. महंमद अली जिनांच्या महत्वकांक्षी मनोवृत्तीला ब्रिटीश राज्यकर्त्यांनी खतपानी घातले. एकेकाळचे धर्मनिरपेक्ष आणि कट्टर टिळकभक्त जिना 1940 नंतर मुस्लिम लिग या कट्टर संघटनेचे सर्वेसर्वा बनले. मुस्लिम लिगच्या गुंडांनी देशभर घातलेला हैदोस, सत्ता संपादन करण्यासाठी आतुर झालेले काँग्रेस नेते यामुळे या देशाची फाळणी होऊन हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हीच एकमेव सर्वमान्य आणि सर्वशक्तीमान संघटना होती. या पक्षांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे आणि सर्वशक्तीने प्रयत्न केले असते तर कदाचित फाळणीचा इतिहास बदलला असता. फाळणी टाळता न येणं हे गांधीजंच्या नेतृत्वाखाली लढणा-या महान देशभक्तांच्या संघटनांचे मोठे अपयश होते. गांधींच्या या अपयशामुळे त्यांच्यावर नाराज असलेला एक वर्ग या देशात होता. त्यातच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरही मोठा गहजब उडाला होता. अखेर 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसे नावाच्या  तरुणाने गांधींची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर देशावर आणि काँग्रेस पक्षावर झालेला हा मोठा आघात होता. देशाच्या विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेचे मोठे पडसाद उमटले. अनेक ब्राम्हण व्यक्तींची घरे यानंतरच्या काही दिवसात जाळण्यात आली. राजकारणात आणि समाजकारणात ब्राम्हण वर्गाचे महत्व कमी करण्यासाठी गोडसेच्या जातीचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला. जातीभेद मिटावा याकरता आयुष्यभर संघर्ष करणा-या गांधींच्या शिष्यांनी या संपूर्ण गोष्टीक़डे दुर्लक्ष केलं.
नेहरुयूग --1947 ते 1964 या काळात काँग्रेसवर संपुर्णपणे नेहरुंचे वर्चस्व होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले जवळपास सर्वच नेते काँग्रेसमध्ये होते. या पुण्याईवर काँग्रेसने सुरवातीच्या काही निवडणुका जिंकल्या. परंतु सत्तेची उब चाखताच काँग्रेस नेत्यांचा भाबडा आशावाद गळून पडला. माणूस स्खलनशील असतो. ह्या तत्वाला काँग्रेसचे नेते अपवाद नाहीत हे देशाने पाहिले. या देशात रामराज्य आले पाहिजे या गांधींच्या स्वप्नाला 'शांतीघाटा'मध्ये कायमची समाधी मिळाली.आंतराराष्ट्रीय नेतृत्व करण्याचा प्रयत्न नेहरुंनी केला. पंचशील करार, अलिप्त राष्ट्र चळवळीला दिलेली चालना, पंचशील करार यासारख्या गोष्टींमुळे नेहरुंनी स्वत:ला तरराष्ट्रीय राजकारणात ब-यापैकी प्रस्थापित केले. परंतु नेहरुंच्या स्वप्नाळू वृत्तीचा मोठा फटका देशाला 1962 मध्ये सहन करावा लागला. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मोठा पराभव स्विकारावा लागला. चीनच्या या हल्ल्याची सुतराम कल्पना भारतीय लष्कराला नव्हती. कारगील घुसखोरीवरुन भाजपला टिका करणा-या काँग्रेस नेत्यांना 1962 च्या या ऐतिहासिक चुकीची आता आठवणही होत नाही.
शास्त्री कालखंड 1964 ते 1966 या लहान परंतु अत्यंत कसोटीच्या काळात लालबहाद्दूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते होते. या काळात दुष्काळ आणि 65 चे युद्ध या दोन मोठ्या परीक्षांना देश समोर गेला. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी देशाला दिला. हरित क्रांतीची बिजं त्यांनी आपल्या कारकिर्दींमध्ये रोवली. देशाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या दुर्देवाने शास्त्रीजींचे 1966 साली अपघाती निधन झाले. शास्त्रीजींना मोठा कालखंड मिळाला असता तर काँग्रेसचे आणि देशाच्या सध्याच्या चित्रात मोठा फरक पडला असता.
इंदिरापर्व ---- काँग्रेस पक्षातील एकमेव पुरुष असं वर्णन त्या काळातल्या अनेक विश्लेषकांनी इंदिरा गांधींचे केले आहे. 1969 मध्ये बंगोलर अधिवेशनात तमाम बड्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड केले. या बंडाने ह्या बाई डगमगल्या नाहीत. इंदिरा काँग्रेस ही नवीन काँग्रेस त्यांनी स्थापन केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बॅंकांचे राष्ट्रीयकरण, 1974 मध्ये पोखरणमध्ये झालेला अणुस्फोट , सिक्किमचे भारतामध्ये केलेले विलिनीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशची निर्मिती ह्या सर्व भक्कम उपलब्धी इंदिराजींच्या आहेत.
कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्याच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.
भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.

राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.
राजीव राजवट --- नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होणं हे काँग्रेसी परंपरेला अगदी साजेसं होतं. एकेकाळी पायलट असणारा हा तरुण कोणताही मंत्रिपदाचा अनुभव नसताना या देशाचा पंतप्रधान झाला. या देशातल्या स्वप्नाळू तरुणांचा प्रतिनिधी म्हणून सुरवातीला राजीव गांधी यांच्याकडे सुरवातीला बघितले गेले. बोफोर्स घोटाळा आणि शाहबानो प्रकरण या दोन प्रकरणामुळे राजीव गांधींच्या या प्रतिमेला तडा गेला. बोफोर्समधले वास्तव आजतागायत बाहेर आलेले नाही. तर शाहबानो प्रकरणामुळे राजीव गांधींची पुरोगामी प्रतिमा किती बेगडी आहे हे सा-या देशाने पाहिले. कट्टरवादी मुस्लिमांच्या दबाबावाला बळी पडून काँग्रेसने घटनादुरुस्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तमा त्यांनी केली नाही. या समाजातल्या मागास वर्गाला त्यातही मुस्लिम समाजाला प्रगतिच्या प्रवाहात येऊ द्यायचे नाही. हे काँग्रेसचे धोरण आहे. असा आरोप नेहमी करण्यात आलाय. शाहबानो प्रकरणामुळे या आरोपाला बळ मिळाले. शाहबानो प्रकरणाच्या दोन दशकांनतर देशातल्या मुस्लिमांची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. काँग्रेस सरकारनेच नेमलेल्या सच्चर आयोगाने ह्या वास्तवावर बोट ठेवलंय.

1984
मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीखांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. या शीख दंगलीबाबत राजीव गांधींनी अगदी बोटचेपी भूमिका घेतली. '' वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर फांद्या कोसळणारच '' हे राजीव गांधी यांचे वाक्य शीख बांधवांच्यया जखमांवर मीठ चोळणारे ठरले. त्यांतर सुमारे दहा वर्ष पंजाब या ज्वालामुखीत जळत होता. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला काँग्रसी राज्यकर्त्यांच्या विघातक धोरणांमुळे बळ मिळाले

.
नरसिंह राव ---गांधी घराण्याच्या व्यतीरिक्त काँग्रेसने एक पंतप्रधान देशाला दिला. ते म्हणजे पी. व्ही. नरसिंहराव. देशाची आर्थिक परिस्थिती डबाघाईला आलेली असताना राव पंतप्रधान झाले. या देशात आर्थिक उदारीकरणाचे युग त्यांनी आणले. आज भारतीय अर्थव्यवस्थेला जे ब-यापैकी दिवस आले आहेत त्याचा पाया नरसिंहराव यांच्याच सरकारनेच रचला. परंतु नरसिंह राव यांचे नेतृत्व हे करिश्माई नव्हते. त्यांच्या काळात आयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेली. या घटनेमुळे मुस्लिम समाज काहीप्रमाणात काँग्रेसपासून दूर गेला. वेगवेगळ्या भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये राव अडकले. काँग्रेसची पक्षसंघटना कमजोर झाली. या सर्व कारणांमुळे 1996 ते 2004 ही आठ वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले.
सोनिया काँग्रेस---काँग्रेस पक्ष अत्यंत कठिण कालखंडामध्ये असताना सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारलं. योग्य पक्षांची घेतलेली साथ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काही फसलेली धोरणे यामुळे 2004 साली काँग्रेस आघाडीला सत्ता मिळवता आली. 2009 मध्ये विरोधकांच्या दूहीचा आणि शक्तीपाताचा फायदा काँग्रेस आघाडीला झाला. मनमोहन सिंग सलग दुस-यांदा देशाचे पंतप्रधान झाले.
आज देशापुढे वाढती महागाई, घुसखोरी, नक्षलवाद, तेलंगाना सारख्या मुद्यावर निर्माण झालेला कट्टर प्रांतवाद ह्या जुन्याच अंतर्गत समस्या मोठ्या होऊन उभ्या आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबानी शक्तींचा वाढत चाललेला प्रभाव, बांगलादेशमधील कडवा धर्मवाद, नेपाळमध्ये माओवादी संघटनांचे वाढते जाळे या गोष्टींचा भारताच्या पुढच्या वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे. या सर्व समस्यांमधून देशाला बाहेर पाडण्यासाठी एखादे लॉंग टर्म व्हिजन काँग्रेसी राज्यकर्त्यांपुढे नाही. ह्य. सर्व समस्यांवर रामबाण औषध शोधण्यापेक्षा केवळ तात्कालिन फायद्याकरता वरवरची मलमपट्टी करण्याची विघातक परंपरा आजही सुरु आहे. सध्या चिघळलेला तेलंगना प्रश्न हे याचे अगदी क्लासिक उदाहरण

देशातल्या नागरिकांनी काँग्रेसवर भरभरुन प्रेम कलं. काँग्रेसी नेत्यांना अगदी देव्हा-यात बसवलं. सत्ता, संपत्ती, किर्ती या सर्व गोष्टींचा भरभरुन उपभोग काँग्रेसी राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे केलाय. या सर्व प्रेमाची उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसी नेत्यांनी केला नाही. स्वातंमत्र्याच्या सहा दशकानंतरही भारताची गणना विकसीत राष्ट्र म्हणून होत नाही. काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या या उदासिन धोरणांचीच फळे भारतीय भोगतायत असं म्हंटल तर यात वावगे काय ?

No comments: