Search This Blog

Monday, 28 February 2011

रोग निर्माण करणारे घटक

रोग निर्माण करणारे घटक
दोष आहेत म्हणून सतत रोग होतो असे नसते, तर दोषांमधला बदल, असंतुलन हेच रोगाला कारण ठरते. आहार-आचरणातील चुकांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आणि रोग हे एकमेकांपासून भिन्नही आहेत व एकमेकांशी संलग्नही आहेत.

युर्वेदात रोगांचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे हे आपण पाहिले. रोग त्याच्या लक्षणांवरून समजतो, मात्र रोग होण्यामागे अनेक घटक असतात. या घटकांमधील असंतुलन, त्यांच्यामधला परस्परसंबंध यांच्यावर रोगाचे स्वरूप, रोगाची तीव्रता ठरत असते. उपचार करतानाही रोगाची नुसती लक्षणे शमवण्याऐवजी रोगाला कारण असणाऱ्या घटकांना ध्यानात ठेवून औषधांची, आहाराची योजना करायची असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये रोग कसा होतो, रोगाला कारणीभूत घटक काय असतात याविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक रोगाचे स्वतःचे असे विशेष व्याधिघटक असले तरी सर्वसाधारणपणे पुढील व्याधिघटक महत्त्वाचे होत.
1. दोष -
नास्ति रोगो विना दोषैः । म्हणजे दोषांशिवाय रोग होऊ शकत नाही. म्हणून दोष हा सर्वात महत्त्वाचा व्याधिघटक असतो. रोगाचा आणि दोषांचा संबंध सुश्रुतसंहितेत पुढील उदाहरणे देऊन समजावला आहे,
दोषान्‌ प्रत्याख्याय ज्वरादयो न भवन्ति, अथ च न नित्यः संबन्धः ।…सुश्रुत सूत्रस्थान
दोषांना सोडून ज्वरादी रोग होत नाहीत असे असले तरी, त्यांचा नित्य संबंधही नसतो. ज्या प्रमाणे विजांचा गडगडाट, वारा सुटणे, वीज पडणे, पाऊस पडणे या गोष्टी आकाशाला सोडून होत नाहीत हे खरे असले तरी, आकाश सतत असतेच. पण म्हणून आकाशात या गोष्टी सतत होत राहतात असे नसते. वातावरणात बदल झाला की, आकाशात या गोष्टी उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे दोष आहेत म्हणून सतत रोग होतो असे नसते तर, दोषांमधला बदल, असंतुलन हेच रोगाला कारण ठरते.
तरबुद्‌बुदादयश्‍च उदकविशेषाः एव वातादीनां ज्वरादीनां च नाप्येवं संश्‍लेषो न परिच्छेदः शाश्‍वातिकः ।…सुश्रुत सूत्रस्थान
वाऱ्याचे निमित्त झाले की, ज्याप्रमाणे शांत पाण्यावर लाटा, बुडबुडे निर्माण होतात, त्याचप्रमाणे आहार-आचरणातील चुकांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आणि रोग हे एकमेकांपासून भिन्नही आहेत व एकमेकांशी संलग्नही आहेत.
2. दूष्य -
दोषांनंतरचा दुसरा व्याधिघटक असतो दूष्य. दुष्यामध्ये सर्व धातू व मलांचा अंतर्भाव असतो. दोष असंतुलित झाले तरी धातू व मल जोपर्यंत संपन्न अवस्थेत असतात, तोपर्यंत रोग होण्याची शक्‍यता कमी असते. यालाच आपण प्रतिकारशक्‍ती म्हणतो. प्रतिकारशक्‍ती चांगली असली की जंतुसंसर्ग झाला तरी रोग होतोच असे नसते. म्हणूून दोष असंतुलित होऊ नयेत यासाठी जेवढी काळजी घ्यावी तेवढीच धातू संपन्न राहावेत, मलभाग योग्य प्रमाणात व योग्य वेळी शरीराबाहेर टाकला जावा याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते.
3. ख-वैगुण्य किंवा स्रोतोवैगुण्य -
कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावताम्‌ ।यत्र सः खवैगुण्यात्‌ व्याधिस्तत्रोपजायते ।।…सुश्रुत सूत्रस्थान
कुपित झालेले दोष शरीरात फिरत असताना त्यांना ज्या ठिकाणी स्थानवैगुण्य सापडेल, अशक्‍त जागा सापडेल त्या ठिकाणी व्याधी उत्पन्न करतात. उदा. प्रकुपित वातदोषाने गुडघ्यांमध्ये आश्रय घेतला तर गुडघेदुखीचा त्रास होईल, खांद्यांमध्ये आश्रय घेतला तर खांदे जखडतील, सर्व सांध्यांचा आश्रय घेतला तर संधिवात होईल, मज्जाधातू-नसांमध्ये आश्रय घेतला तर अर्धांगवायू होऊ शकेल वगैरे. या प्रकारचे ख-वैगुण्य, अशक्‍तपणा मर्मस्थानी असेल तर होणारा रोग गंभीर असू शकतो. म्हणूनच आयुर्वेदाने मेंदू, हृदय, बस्ती वगैरे अवयवांची खास काळजी घ्यायला सांगितली आहे.
4. आम -
चौथा व्याधिघटक असतो आम. आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्‍तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा असा अन्नरस म्हणजे ‘आम” होय. हा आम अशा स्थितीतला असतो की धड त्याचे शक्‍तीतही रूपांतर होत नाही तसेच मलमार्गाने विसर्जनही होत नाही. असा जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्‍त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम अनेकविध रोगांचे मूळ कारण असतो. शरीरात आम वाढला की शरीरावर पुढील लक्षणे दिसू लागतात.
स्रोतोरोधबलभ्रंशगौरवानिलमूढताआलस्या-पक्‍तिनिष्ठिवमलसारुचिक्‍लमाः ।
* अंग जखडल्यासारखे वाटते, विशेषतः सकाळी उठल्यावर हालचाल करताना सुरवातीला कडकपणा (स्टिफनेस) जाणवतो.
* शरीरशक्‍तीचा ऱ्हास होतो.
* शरीरास जडपणा प्राप्त होतो, आळस भरल्यासारखा वाटतो.
* पचन योग्य प्रकारे होत नाही, गॅसेस होतात.
* तोंडाला चव नसते, मल-मूत्रविसर्जन समाधानपूर्वक होत नाही.
* उत्साह राहत नाही.
आम हे चिकट विषद्रव्य असल्याने सर्व धातूत लीन होऊन राहते व शरीरात निरनिराळ्या ठिकाणी जाऊन प्रकृतीनुरूप किंवा शारीरिक परिस्थितीनुसार रोग उत्पन्न करू शकते. उदा. सांध्यांमध्ये आम पोचला तर आमवात (सांधेदुखी) होतो, रक्‍तामध्ये साठून राहिला तर रक्‍तातील चरबीचे प्रमाण वाढलेले सापडते, रक्‍तवाहिन्यांमध्ये गेला तर त्यांच्यात अवरोध निर्माण होतो, फुप्फुसांमध्ये पोचला तर फायब्रॉसिस होऊ शकते. अशा प्रकारे मूळ कारण “आम” हे एकच असले तरी त्याचा परिणाम म्हणून विविध रोग होऊ शकतात.
- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments: